Sunday, 1 March 2020

मुक्त शिक्षणासाठी मुक्त शैक्षणिक स्रोत एक परिचय (OER4OE)




मित्रानो, युट्युब वरील व्हिडीओ पाहून एखादी स्त्री जेंव्हा नवनवीन खाद्यपदार्थ बनविते किंवा एखादा सुतार चक्क बंदुका बनवितो या बातम्या वाचल्या की या माध्यमांची शिकण्या शिकविण्याच्या प्रक्रियेतील उपयुक्तता व शिकण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करण्याची प्रचंड शक्ती अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. सामाजिक आंतरक्रिया माध्यमानी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार केला आहे तर मुक्त शैक्षणिक स्रोतांमुळे Open Educational Resources (OER) ज्ञानाच्या क्षेत्रातील मक्तेदारी व विषमता दूर करून मोफत /सर्वांना परवडणारे गुणवत्तापूर्ण, भेदभावरहीत, स्वतःच्या गरजेनुसार, आवडीनुसार शिक्षण मिळविण्याचे नवीन दलनच खुले झाले आहे. या स्त्रोतांमुळे ज्ञान व ज्ञाननिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वाना सहजपणे उपलब्ध होईल. ज्ञानाधिष्टीत समाजाच्या निर्मितीसाठी मुक्त शैक्षणिक स्रोताची अपरिहार्यता आज जगभरात मान्य केली जात आहे.  मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या माध्यमातून स्थानिक ते वैश्विक ज्ञान सहज उपलब्ध होणे हे आधुनिक समाजासाठी आवश्यक आहे.   
मुक्त शैक्षणिक स्रोत म्हणजे ज्या शैक्षणिक स्रोतांचा स्वयंअध्यन, अध्ययन-अध्यापन व संशोधनासाठी कोणत्याही निर्बंधा शिवाय अथवा अतिशय मर्यादित निर्बंधासह मोफत उपयोग करून घेता येतो असे शैक्षणिक संसाधने होय. सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून दिली गेलेली अथवा मुक्त अनुज्ञपती (open licence) सह उपलब्ध असणारी डिजिटल किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची पाठ्यपुस्तके, लिखित सामग्री, व्हिडीओ, ऑडिओ, रेखाचित्रे, आलेख, चित्रे, दिगदर्शने, अ‍ॅनिमेशन, मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स (MOOCs) अथवा अन्य कोणतीही सामग्री जिचा अध्ययन, अध्यापन, संशोधन व प्रशिक्षण यांच्यासाठी उपयोग होऊ शकतो.  
मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या निर्मात्यांनी मुक्त लायसन द्वारे त्यांचे स्वामित्व हक्क अतिशय मर्यादित स्वरूपात स्वतः कडे ठेवल्याचे घोषित केलेले असते. मुक्त शैक्षणिक स्रोतांचा वापर, पुनर्वापर, पुनरसंपदान, मूळ अथवा पुनर्निर्मिती सामग्रीचे इतरांना वाटप करणे अधिक सहज सोपे झाले आहे. या स्त्रोतांमुळे उच्च शिक्षणावरील खर्च तर कमी होईलच मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वैश्विक दरवाजेही सर्वांसाठी उघडले जातील. गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन सामग्रीच्या खरेदीसाठी करावा लागणार नपरवडणार खर्च कमी होईल.
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या मुक्त शैक्षणिक स्त्रोतांची सुरवात कधी आणि कशी झाली? तर चला मग थोडासा इतिहास पाहूया. मुक्त शैक्षणिक स्त्रोतांची चळवळ उभी राहण्याला दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत झाल्या एक म्हणजे  इंटरनेटचा झलेला प्रसार आणि दुसरे म्हणजे सर्वप्रकारच्या सामुग्रीचे  डिजिटल स्वरूप अश्या डिजिटल अमुग्रीची कॉपी करणे व ती कांही सेकंदात प्रसारित करण्याच्या तंत्रज्ञानाचा झालेला विकास. १९९९ साली जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ टर्बिनगन व युके मधील मुक्त विद्यापीठ यांनी त्यांची कांही शैक्षणिक सामुग्री मोफत उपलब्ध करून दिली. पुढे २००२ मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट (MIT) ने त्यांचे ३२ कोर्स मुक्त लायसन सह सुरु केले. पुढे युनेस्कोने OER ही संकल्पना रूढ केली. २००८ मध्ये झालेल्या केपटाऊन मुक्त शिक्षण घोषणापत्राने स्वाक्षरी करणाऱ्या देशांना सार्वजनिक पैशातून तयार झालेल्या शैक्षणिक व संशोधनात्मक स्रोतांना इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे सांगितली व मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या निर्मितीसाठी प्रेरित केले. याच वर्षी कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबा यांनी पहिला मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स (MOOC) सादर केला. २०१२ मध्ये पॅरिस मुक्त शिक्षण स्रोत घोषणापत्राने सार्वजनिक निधी अथवा अनुदानातून तयार झालेले सर्व प्रकारची शैक्षणिक व संशोधन विषयक सामुग्री मुक्त लायसन्सह उपलब्ध करून देण्याची मार्गदर्शक तत्वे दिली व सर्व  देशांच्या शासनाला प्रेरित केले. भारताने २०१४ साली नॅशनल मिशन ऑफ एजुकेशन द्वारे आयसीटी (NMEICT) ची घोषणा केली व सार्वजनिक पैस्यातुन तयार होणाऱ्या शैक्षणिक स्रोतांसाठी  मुक्त लायसनचे धोरण स्वीकारले. पुढे सप्टेंबर २०१७ मध्ये युनेस्कोने दुसरी जागतिक OER परिषद घेतली व OER च्या निर्मिती व वापरासाठी प्रचार प्रसार करण्याचे धोरण निश्चित केले. नुकतेच नोव्हेंबर २०१९ मध्ये युनेस्कोने मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या निर्मिती व प्रचार प्रसाराच्या शिफारशींना स्वीकृती दिलेली आहे.
थोडक्यात काय तर सार्वजनिक निधी व अनुदानातून निर्माण झालेले ज्ञान अथवा अन्य कोणतेही अध्ययन-अध्यापनासाठी उपयुक्त सामग्री मुक्त शैक्षणिक सामग्री म्हणून घोषित करण्याचा निर्णय जागतिक समुदायाने घेतलेला आहे.      

अधिकाधिक दर्जेदार, विश्वसनीय, प्रमाणित शैक्षणिक स्त्रोतांची OER निर्मिती करणे ही एक आजच्या शिकलेल्या पिढीची जबाबदारी आहे. त्याच बरोबर उपलब्ध असलेल्या मुक्त शैक्षणिक स्रोतांचा OER गुणवत्तापूर्ण अध्ययन-अध्यापनासाठी वापर करणे, OER विषयीची जागृती वाढविणे हे ज्ञानाधिष्ठित समाजातील ज्ञान कार्यकर्त्यांचे म्हणजेच शिक्षकांचे काम आहे.    

Creative Commons License
मुक्त शिक्षणासाठी मुक्त शैक्षणिक स्रोत एक परिचय (OER4OE) by Dr. Mahesh Koltame is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.

5 comments:

  1. nice work sir ji good information

    ReplyDelete
  2. Incredible contribution sir.. Thanks You.

    ReplyDelete
  3. Sir ji good information.Thanks you

    ReplyDelete
  4. Nice information sir Thanks

    ReplyDelete
  5. Hya lekatun khup mahatv purn mahiti milali adhyayan Ani adhyapana sathi vividh shaikshanik stroatanchi mahiti milali thank you sir

    ReplyDelete