Thursday, 5 March 2020

मुक्त शैक्षणिक स्रोतांसाठी क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती



मित्रानो, आज इंटरनेट मुळे संपुर्ण जगातील माहिती, ज्ञान, साधने आणि अध्ययन स्रोत सर्वाना सहज पणे उपलब्ध होत आहेत. इंटरनेट मुळे ज्ञानाधिष्टीत समाजाची जडणघडण होत आहे हे खरे. एखादया संशोधक अभ्यासकाला इंटरनेट वर एखादे उपयुक्त संशोधन साधन, संसाधन सापडले ते त्याच्यासाठी उपयोगी ठरणारे आहे मात्र त्याचा वापर कसा करणार? संबंधित निर्मात्याचा केवळ उल्लेख करणे पुरेशे होईल काय? किंवा त्याची लेखी परवानगी घ्यावी लागेल? त्यासाठी कंही पैसे द्यावे लागतील काय? आपन केलेला उपयोग ही साहित्याची चोरी तर ठरणार नहीं ना? इत्यादी अनेक प्रश्न उभे राहतात. याचे कारण आहे प्रताधिकार (Copyright) कायदा. लेखक अथवा निर्मात्याने त्याच्या सर्जनशील कामाचे कॉपी राइट्स सुरक्षित केले असतील तर त्या सामग्रीचा मोफत वापर अथवा प्रसार बेकायदेशीर, अनैतिक ठरू शकतो. थोडक्यात प्रताधिकार कायदा काय आहे ते पहु म्हणजे मुक्त लायसन ची आवश्यकता लक्षात येईल.

मित्रांनो, यूरोपमध्ये १६ व्या शतकात छपाईच्या तंत्राचा विकास झाला. या नवीन तंत्राच्या विकासामुळे छापील सामग्री कॉपी करणे व हवे तेवढ्या त्याच्या प्रति तयार करणे सोपे झाले आणि त्या बरोबरच साहित्याची चोरी करणे स्वतःच्या नावाने छापणे इत्यादी अनैतिक गोष्टींचा सुळसुळाट झाला. परिणामी याला आळा घालण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे गरजेचे होते त्यातूनच प्रताधिकार म्हणजेच कॉपीराईट ही संकल्पना विकसित झाली. सर्वप्रथम इंग्लंड व स्कॉटलंड मध्ये १७१० मध्ये प्रताधिकार कायदा अस्तित्वात आला. पुढे त्यात वेळोवेळी सुधारणा होऊन त्याचा विस्तार झाला. भारतात भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ ला अस्तित्वात आला. तो ब्रिटिश प्रताधिकार कायदा १९११ ला आधार मानून तयार केला गेला आहे. थोडक्यात काय तर साहित्यिक, कलात्मक शैक्षणिक किंवा सांगीतिक सर्जनशील कार्य अथवा सामग्री जसे सांगीतिक रचना, व्हिडीओ, ध्वनिमुद्रने, चित्रे, आलेख तक्ते इमरतींचे अथवा बांधकामाचे आराखडे मूल्यमापनाच्या चाचण्या, मूल्यांकनाची साधने इत्यादींचा वापर, पुनर्वापर, कॉपी करून हवे तेवढया प्रति तयार करण्याचे सर्व अधिकार त्याच्या निर्मात्याला अथवा लेखकाला मिळाले. निर्मात्याव्यतिरिक्त इतरांच्या वापरावर कायदेशीर निर्बंध घालण्याच्या व सृजनशील निर्मिती करणाऱ्या लेखक, निर्माता यांच्या अधिकराचे संरक्षण करण्याच्या धोरणाला कॉपीराईट असे म्हणता. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कॉपी करणे, तिचे इतराना वाटप करणे सहज सोपे आणि झटपट काम झाले त्यामुळे प्रताधिकाराचे महत्व वाढले. कॉपीराईट मुळे संबंधित सामग्रीच्या लेखकाला, निर्मात्याला त्याच्या बौद्धिक श्रमाचे व निर्मितीचे श्रेय मिळणे सोपे झाले परिणामी त्यांच्या कार्याचा मोबदला मिळवणे शक्य झाले. 

असे असले तरीप्रत्येक वेळी वर्गणी अथवा खरेदी सर्वानाच विशेषतः विद्यार्थ्यांना परवडणारी नसते. बऱ्याचदा अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी उपयोगी ठरणाऱ्या सर्जनशील लेखन, कलात्मक, संगीतिक रचना, शैक्षणिक साधनसामग्रीचा कायदेशीर वापर करण्यास त्याच्या निर्मात्यांची हरकत नसते; मात्र ते स्पष्ट होण्यासाठी तसेच निर्माता त्याच्या निर्मितीचा किती व कसा वापर काण्यास परवानगी देतोय हे कळण्याचा उपाय नव्हता. ज्या सामुग्री निर्मात्यांना त्यांचे साहित्य इतरांनी शिक्षणासाठी अथवा संशोधनासाठी कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय व मोफत उपयोगात आणण्यास कांहीच हरकत नसेल, किंवा मर्यादित निर्बंधांसह वापरण्याची परवानगी देण्याची तयारी असेल तर त्या साठीची कायदेशीर व्यवस्था आवश्यक होती त्यातूनच २००२ मध्ये अमेरिकेत क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती संकल्पना अस्तित्वात आली. 

क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती ही सार्वजनिक प्रताधिकार परवाण्याचाच एक प्रकार आहे.  या अनुज्ञप्ती मुळे सर्जनशील कामाचा अथवा निर्मितीचा विनामूल्य वापर तसेच इतरांना वाटप करण्याची परवानगी मिळते. एखाद्या लेखकाला त्याच्या सर्जनशील लेखनाचे अथवा संशोधनात्मक निर्मितीचे इतरांना कोणत्याही निर्बंधांशिवाय अथवा मर्यादित निर्बंधांसह वाटप करण्याची इच्छा असते तेंव्हा तो या प्रकारच्या (CC) अनुज्ञप्तीचा वापर करतो. त्यालाच क्रिएटिव्ह कॉमन्स  (CC) अनुज्ञप्ती असे म्हणतात. या प्रकारची अनुज्ञप्ती देताना निर्मात्याने कोणते अधिकार सुरक्षित ठेवले आहेत किंवा कोणते निर्बंध घातले आहेत त्यावरून त्यांचे पुढील सहा प्रकारात विभाजन करता येते.  

मुक्त CC लायसन्स चे प्रकार:

१. CC-BY (Attribution) लायसन: 
CC-BY
या प्रकारच्या लायसन द्वारे लेखक अथवा निर्माता त्याला म्हणजेच मूळ लेखकाला अथवा  निर्मात्याला सादर कार्याचे श्रेय देऊन म्हणजेच वापरताना हे काम "----" यांचे आहे असा उल्लेख करून इतर कोणीही सामग्रीची स्वतःच्या गरजेनुसार व संदर्भानुसार पुनर्मांडणीरीमिक्सकरून वापरण्यास अथवा वाटप करण्यास परवानगी देतो. एवढेच नाही तर मूळ लेखक अथवा निर्माता याला त्याच्या कार्याचे श्रेय देऊन सामग्रीचा शैक्षणिक अथवा व्यवसायिक वापरास  सुद्धा परवानगी देतो.  

२. CC-BY-SA (Attribution Share Alike) लायसन:
CC-BY-SA
हा परवाना मुळ लेखक अथवा निर्मात्याला निर्मितीचे श्रेय देऊन इतरांना सामग्रीचा वापर, रीमिक्स, रुपांतर करण्यास, तिचे वाटप करण्यास एवढेच नाही तर व्यवसायिक वापर करण्यास सुद्धा परवानगी देतो. मात्र यात अजून एक अट आहे ती म्हणजे तुम्ही लेखकाला श्रेय देऊन या प्रकारची परवानगी असलेली सामग्री वापरून नवीन सामग्रीची निर्मिती केली तर त्या नवीन निर्मितीला मूळ सामग्री साठी वापरलेल्या लायसनच्या अटी शर्ती असलेले लायसन वापरने बंधनकारक आहे. या परवानाची तुलना बर्‍याचदा "Copyleft" विनामूल्य आणि मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवान्यांशी केली जाते. वापरले जात असलेल्या समग्रीवर आधारित सर्व नवीन कामे मुळ स्रोताच्या परवान्या समान परवाना घेतला गेला पाहिजे. हा परवाना व्यवसायिक वापरास अनुमती देतो. विकिपीडियासाठी वापरलेले लायसन अथवा परवाना याच प्रकारचा आहे. अर्थात विकिपीडियामधील सामग्रीचा समावेश करुन तयार झालेली अन्य सामुग्री ही सुद्धा पुढे मुक्त वापरासाठीच राहील व अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल ही अपेक्षा आहे.

३. CC-BY-ND (Attribution-NoDerivs) लायसन: 
CC-BY-ND
हा परवाना लेखक अथवा निर्मात्याला श्रेय देऊन इतरांना संबंधित स्रोतांचा व्यावसायिक वापरासह कोणत्याही कारणासाठी पुन्हा वापरण्याची परवानगी देतोमात्रते रुपांतरित स्वरूपात  इतरांना  वाटप केले जाऊ शकत नाही. 

४. CC-BY-NC (Attribution-Non Commercial) लायसन:
CC-BY-NC
या प्रकारचा परवाना लेखक अथवा निर्मात्याला त्याच्या निर्मितीचे श्रेय देऊन इतरांना स्रोतांचा वापर, रिमिक्स पुनर्रचना करून वाटप  करण्याची परवानगी देते मात्र त्याचा व्यवसायिक वापर करता येणार नाही. या सामग्रीचा उपयोग करून नवीन सामग्री तयार करताना मूळ लेखकाचे  अथवा अनिर्मात्याची माहिती द्यावी लागेल व अव्यावसायिक उपयोग करण्याचे बंधन असेल. यावर आधारित पुढील निर्मितीला परवाना देताना मूळ कार्याचाच परवाना देण्याचे यात बंधन नाही. 

५. CC-BY-NC-SA (Attribution- Non Commercial-Share Alike) लायसन: 
CC-BY-NC-SA
हा परवाना मूळ लेखक अथवा निर्मात्याला त्यांच्या निर्मितीचे श्रेय देऊन स्रोतांचा वापररिमिक्स करण्यास अथवा नवीन पुनर्रचित सामुग्री  तयार करण्यास परवानगी देतो मात्र मुळ  स्त्रोताच्या परवान्यातील अटींसहच नवीन निर्मितीचे लायसन घेणे बंधनकारक आहे तसेच त्याच्या व्यावसायिक वापराची परवानगी यात नसते 

६. CC-BY-NC-ND (Attribution-Non Commercial-NoDerivs) लायसन:
CC-BY-NC-ND
हा परवाना सामग्रीचा उपयोग करणऱ्यावर जास्तीत जास्त निर्बंध घालतो. इतरांना केवळ सामग्री डाउनलोड करण्याची अनुमती दिलेली असते. हा परवाना लेखकाला श्रेय देत त्याच्या नावासह संबंधित स्रोताचे इतरांना वाटप  करण्यास अनुमती देतो परंतु वापरकर्ता मुळ सामग्रीत कोणत्याही प्रकारचे बदल अथवा रिमिक्स करू शकत नाही तसेच यात सामग्रीचा  व्यावसायिक वापर करण्यास ही प्रतिबंध आहे
https://creativecommons.org/spectrum-with0/
वरील सर्व प्रकारच्या लायसन पैकी पहिल्या प्रकारचे लायसन हे अधिकाधिक मुक्त स्वरुपाचे ठरते तर त्या नंतरच्या लायसन प्रकारामधे वापर कर्त्याच्या स्वायत्तेवर निर्बंध येत जातात. शेवटच्या प्रकारात तर सामग्री वापरणाऱ्यांवर खूप मर्यादा येते. बाजूला दिलेल्या ग्राफिक वरून आपल्याला प्रताधिकार मुक्त अवस्था ते प्रताधिकार यांच्या मधील मध्यम मार्ग म्हणजे CC अनुज्ञप्ती होय याची जाणीव होते. 

थोडक्यात काय तर तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 
"जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांशी सांगावे। 
 शहाणे करुण सोडावे। सकळ जन।।    
या उपदेशाजवळ आज जग आलेले आहे व ज्ञानाचा अधिकाधिक लोकांना मुक्त पणे वापर करता यावा या साठी मुक्त अनुज्ञप्ती ची व्यवस्था विकसित झालेली आहे तिचा आपन सर्वांनी मोठ्या मनाने स्वीकार करून आपल्याच संस्कृतीचा वारसा नव्या पद्धतीने पुढे चलवायला हवा असे मला वाटते. 



Creative Commons License
मुक्त शैक्षणिक स्रोतांसाठी क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती by Dr. Mahesh Koltame is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License.

Sunday, 1 March 2020

मुक्त शिक्षणासाठी मुक्त शैक्षणिक स्रोत एक परिचय (OER4OE)




मित्रानो, युट्युब वरील व्हिडीओ पाहून एखादी स्त्री जेंव्हा नवनवीन खाद्यपदार्थ बनविते किंवा एखादा सुतार चक्क बंदुका बनवितो या बातम्या वाचल्या की या माध्यमांची शिकण्या शिकविण्याच्या प्रक्रियेतील उपयुक्तता व शिकण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करण्याची प्रचंड शक्ती अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. सामाजिक आंतरक्रिया माध्यमानी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार केला आहे तर मुक्त शैक्षणिक स्रोतांमुळे Open Educational Resources (OER) ज्ञानाच्या क्षेत्रातील मक्तेदारी व विषमता दूर करून मोफत /सर्वांना परवडणारे गुणवत्तापूर्ण, भेदभावरहीत, स्वतःच्या गरजेनुसार, आवडीनुसार शिक्षण मिळविण्याचे नवीन दलनच खुले झाले आहे. या स्त्रोतांमुळे ज्ञान व ज्ञाननिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वाना सहजपणे उपलब्ध होईल. ज्ञानाधिष्टीत समाजाच्या निर्मितीसाठी मुक्त शैक्षणिक स्रोताची अपरिहार्यता आज जगभरात मान्य केली जात आहे.  मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या माध्यमातून स्थानिक ते वैश्विक ज्ञान सहज उपलब्ध होणे हे आधुनिक समाजासाठी आवश्यक आहे.   
मुक्त शैक्षणिक स्रोत म्हणजे ज्या शैक्षणिक स्रोतांचा स्वयंअध्यन, अध्ययन-अध्यापन व संशोधनासाठी कोणत्याही निर्बंधा शिवाय अथवा अतिशय मर्यादित निर्बंधासह मोफत उपयोग करून घेता येतो असे शैक्षणिक संसाधने होय. सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून दिली गेलेली अथवा मुक्त अनुज्ञपती (open licence) सह उपलब्ध असणारी डिजिटल किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची पाठ्यपुस्तके, लिखित सामग्री, व्हिडीओ, ऑडिओ, रेखाचित्रे, आलेख, चित्रे, दिगदर्शने, अ‍ॅनिमेशन, मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स (MOOCs) अथवा अन्य कोणतीही सामग्री जिचा अध्ययन, अध्यापन, संशोधन व प्रशिक्षण यांच्यासाठी उपयोग होऊ शकतो.  
मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या निर्मात्यांनी मुक्त लायसन द्वारे त्यांचे स्वामित्व हक्क अतिशय मर्यादित स्वरूपात स्वतः कडे ठेवल्याचे घोषित केलेले असते. मुक्त शैक्षणिक स्रोतांचा वापर, पुनर्वापर, पुनरसंपदान, मूळ अथवा पुनर्निर्मिती सामग्रीचे इतरांना वाटप करणे अधिक सहज सोपे झाले आहे. या स्त्रोतांमुळे उच्च शिक्षणावरील खर्च तर कमी होईलच मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वैश्विक दरवाजेही सर्वांसाठी उघडले जातील. गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन सामग्रीच्या खरेदीसाठी करावा लागणार नपरवडणार खर्च कमी होईल.
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या मुक्त शैक्षणिक स्त्रोतांची सुरवात कधी आणि कशी झाली? तर चला मग थोडासा इतिहास पाहूया. मुक्त शैक्षणिक स्त्रोतांची चळवळ उभी राहण्याला दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत झाल्या एक म्हणजे  इंटरनेटचा झलेला प्रसार आणि दुसरे म्हणजे सर्वप्रकारच्या सामुग्रीचे  डिजिटल स्वरूप अश्या डिजिटल अमुग्रीची कॉपी करणे व ती कांही सेकंदात प्रसारित करण्याच्या तंत्रज्ञानाचा झालेला विकास. १९९९ साली जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ टर्बिनगन व युके मधील मुक्त विद्यापीठ यांनी त्यांची कांही शैक्षणिक सामुग्री मोफत उपलब्ध करून दिली. पुढे २००२ मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट (MIT) ने त्यांचे ३२ कोर्स मुक्त लायसन सह सुरु केले. पुढे युनेस्कोने OER ही संकल्पना रूढ केली. २००८ मध्ये झालेल्या केपटाऊन मुक्त शिक्षण घोषणापत्राने स्वाक्षरी करणाऱ्या देशांना सार्वजनिक पैशातून तयार झालेल्या शैक्षणिक व संशोधनात्मक स्रोतांना इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे सांगितली व मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या निर्मितीसाठी प्रेरित केले. याच वर्षी कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबा यांनी पहिला मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स (MOOC) सादर केला. २०१२ मध्ये पॅरिस मुक्त शिक्षण स्रोत घोषणापत्राने सार्वजनिक निधी अथवा अनुदानातून तयार झालेले सर्व प्रकारची शैक्षणिक व संशोधन विषयक सामुग्री मुक्त लायसन्सह उपलब्ध करून देण्याची मार्गदर्शक तत्वे दिली व सर्व  देशांच्या शासनाला प्रेरित केले. भारताने २०१४ साली नॅशनल मिशन ऑफ एजुकेशन द्वारे आयसीटी (NMEICT) ची घोषणा केली व सार्वजनिक पैस्यातुन तयार होणाऱ्या शैक्षणिक स्रोतांसाठी  मुक्त लायसनचे धोरण स्वीकारले. पुढे सप्टेंबर २०१७ मध्ये युनेस्कोने दुसरी जागतिक OER परिषद घेतली व OER च्या निर्मिती व वापरासाठी प्रचार प्रसार करण्याचे धोरण निश्चित केले. नुकतेच नोव्हेंबर २०१९ मध्ये युनेस्कोने मुक्त शैक्षणिक स्रोतांच्या निर्मिती व प्रचार प्रसाराच्या शिफारशींना स्वीकृती दिलेली आहे.
थोडक्यात काय तर सार्वजनिक निधी व अनुदानातून निर्माण झालेले ज्ञान अथवा अन्य कोणतेही अध्ययन-अध्यापनासाठी उपयुक्त सामग्री मुक्त शैक्षणिक सामग्री म्हणून घोषित करण्याचा निर्णय जागतिक समुदायाने घेतलेला आहे.      

अधिकाधिक दर्जेदार, विश्वसनीय, प्रमाणित शैक्षणिक स्त्रोतांची OER निर्मिती करणे ही एक आजच्या शिकलेल्या पिढीची जबाबदारी आहे. त्याच बरोबर उपलब्ध असलेल्या मुक्त शैक्षणिक स्रोतांचा OER गुणवत्तापूर्ण अध्ययन-अध्यापनासाठी वापर करणे, OER विषयीची जागृती वाढविणे हे ज्ञानाधिष्ठित समाजातील ज्ञान कार्यकर्त्यांचे म्हणजेच शिक्षकांचे काम आहे.    

Creative Commons License
मुक्त शिक्षणासाठी मुक्त शैक्षणिक स्रोत एक परिचय (OER4OE) by Dr. Mahesh Koltame is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.